नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातील सर्वाधिक रुग्णसंख्या एकट्या महाराष्ट्रात आहे. आत्तापर्यंत अनेक राजकीय नेतेमंडळींसह अनेकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये हजारो रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘कोर्ट’ चित्रपटाचे प्रमुख अभिनेते आणि विद्रोही आंबेडकरी कार्यकर्ता विरा साथीदार यांचे कोरोना व्हायरसची लागण झाल्याने मृत्यू झाला.
विरा साथीदार यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी नागपुरातील एम्समध्ये काही दिवसांपासून दाखल करण्यात आले होते. त्यानुसार, त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र, विरा साथीदार यांची मृत्यूची झुंज अखेर संपली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. वीरा साथीदार यांनी 19 मार्चला कोरोना प्रतिबंधात्मक लसही घेतली होती आणि त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. अखेर यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने चळवळीचा विद्रोही आणि लढाऊ कार्यकर्ता हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
कोर्ट चित्रपटात प्रमुख भूमिका
चैतन्य ताम्हाणे यांच्या ‘कोर्ट’ या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला होता. यानंतरही चळवळीशी संबंधित चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. नागपूरला आलेल्या वीरा यांचे आंबेडकरी चळवळीशी नाते जुळले. तसेच शेकडो आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.