बहुजननामा ऑनलाईन टीम : जगभरात कोरोना व्हायरसने विळखा घट्ट केला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोनो बाधित रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे संबंधित देशाचे प्रशासन हतबल झाले आहे. कोरोनामुळे चीननंतर आता इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. इटलीमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 475 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा कहर जगभरात वाढत जात असून सध्या याचा सर्वाधित परिणाम इटलीमध्ये झाला आहे.
इटलीमध्ये एका दिवसात 475 लोकांचा मृत्यू झाल्यामुळे नागरिक भीतीखाली आहेत. आतापर्यंत एका दिवसात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाल्याची नोंद झाली आहे. आतापर्यंत दोन हजार नऊशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 4 हजार 207 नवे रूग्ण समोर आले आहेत. त्यामुळे इटलीतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 35 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. त्यापाठोपाठ ब्रिटनमध्येही परिस्थिती गंभीर झाली असून तिथे एका दिवसांत 33 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 676 नवी रूग्ण समोर आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
देशातील सर्व शिक्षण संस्था बंद कण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. तसेच इराणमध्ये आणखी 147 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1 हजार 135 वर पोहोचला आहे. इराणसोबतच पाकिस्तान, युएई, बहरनी आणि कुवेत या देशांमध्येही कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसनने बुधवारी देशात आपातकालीन परिस्थितीची घोषणा केली आहे. तसेच सौदी अरबमधील देशांनी मशिदीत नमाज पठण करण्यावर बंदी आणली आहे. जगातील महासत्ता म्हणून असलेल्या अमेरिकेतही कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसने पीडितांची संख्या 6 हजार 500 पार गेली आहे. तसेच 115 लोकांचा मृत्यू झाला आहे.