बहुजननामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायरस बाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार केले जाऊ शकतात, यावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची मते वेगवेगळी आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचे अद्याप पुरावे नाहीत. याबाबत अजून संशोधन सुरु आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्लाझ्मा थेरपीचा वापर न केल्यास यामुळे रुग्णाच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी प्लाझ्मा थेरपीवर बरीच चर्चा सुरु आहे. कोरोनासाठी देशात काय तर जगभरात कोणतीही मान्यताप्राप्त थेरपी नाही. प्लाझ्मा थेरपीबद्दल कोणताही पुरावा सध्यातरी नाही की, त्याचा उपयोग कोरोनावर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. प्लाझ्मा थेरपी याबाबतीत अजूनही प्रायोगिक स्तरावर आहे. याबाबत आयसीएमआर (इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च) अभ्यास करत आहे. जोपर्यंत आयसीएमआर अभ्यास पूर्ण करत नाही, तोपर्यंत प्लाझ्मा थेरपीचा केवळ संशोधन किंवा चाचणीसाठीच वापर करावा. जर आपण मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्लाझ्मा थेरपी वापरत नसाल तर ते आपल्या जीवाला धोका देऊ शकते.