बहुजननामा ऑनलाईन टीम – कोरोना रुग्णावर मुंबईमधील लिलावती रुग्णालयात पहिली प्लाझ्मा थेरपी करण्यात यशस्वी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजना संदर्भात बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांंशी बोलताना टोपे यांनी ही माहिती दिली.
लिलावती रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेली असून त्यात यश मिळाले आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मला ही थेरपी यशस्वी झाली असल्याची माहिती दिली आहे. आता नायर रुग्णालयात दुसरी थेरपी केली जाणार आहे. नायर रुग्णालयातील डॉक्टरांनीही आपल्याला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पण ही थेरपी करताना योग्य मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. पुण्यातही हा प्रयोग करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मालेगावमधील परिस्थितीवर बोलताना राजेश टोपे यांनी, दाटीवाटीची जागा असल्याने अनेक ठिकाणी लोकाना घरात क्वारंटाइन होणे शक्य नाही.
पण शक्य आहे तिथे संस्थात्मक क्वारंटाइन केले जावे अशी सूचना जिल्हाधिर्यांना दिली आहे. बैठकीत मालेगावमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्या पार्श्वभुमीवर चर्चा करण्यात आली असून 200 खाटांचे रुग्णालय कोरोनासाठी वापरले जाणार आहे. डॉक्टर, नर्स जे पोस्टिंग केल्यानंतरही गेलेले नाहीत त्यांना 24 तास दिले आहेत. जर ते जॉईन झाले नाहीत तर निलंबन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यांना लागणार्या सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. जायचंच नाही हा दृष्टीकोन योग्य नाही, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.