बहुजननामा ऑनलाईन टीम – राज्यात कोरोनाचा हैदोस सुरुच असून पुण्यापाठोपाठ मुंबईतही रूग्णसंख्या वेगाने वाढत आहे. विशेषतः धारावी झोपडपट्टीत कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मंगळवारी धारावीमध्ये तब्बल 42 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तेथील संख्या 330 झाली आहे. कोरोना संख्या वाढू लागल्यामुळे धारावी पालिका प्रशासनासाठी डोकेदुखी बनण्याची चिन्हे आहेत.
धारावीमध्ये मागील काही दिवसांपुर्वी तुलनेत कमी संख्येने नवे रुग्ण सापडत होते. मात्र मंगळवारी तब्बल 42 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे धारावीतील करोनाबाधितांची संख्या 330 वर पोहोचली आहे. तर मंगळवारी करोनामुळे चौघांचा मृत्यू झाला असून करोना बळींची सख्या 18 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधितांना शीव रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी या दोन्ही रुग्णालयांमधील प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या चौघांपैकी एक महिला आणि एक पुरुष 60 वर्षांचे होते.
धारावीमधील कासारवाडी, सोशल नगर, माटुंगा लेबर कॅम्प, कुंची कुर्वे नगर, आझाद नगर, संजय गांधी नगर, पिवळा बंगला, मुकुंद नगर, न्यू म्युनिसिपल चाळ, मार्केडाय सोसायटी, धोबी घाट, मोची गल्ली, शताब्दी नगर, पी.व्ही. चाळ, आगास वाडी, उदय सोसायटीमध्ये करोनाबाधित रुग्ण सापडले असून हा परिसर धोकादायक बनला आहे. दादर आणि माहीममध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे पालिका अधिकार्यांना दिलासा मिळाला होता. मात्र मंगळवारी दादरमध्ये चार, तर माहीममध्ये पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणची करोनाबाधितांची संख्या अनुक्रमे 33 व 30 वर पोहोचली आहे.