बहुजननामा ऑनलाइन – देशभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना चिंतेत भर टाकणारी बाब म्हणजे मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. अशातच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या आणि सुवर्ण मंदिरात हजुरी रागी काम केलेल्या व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पंजाबच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. अमृतसरमधील जीसीएमएच रुग्णालयात या व्यक्तीला दाखल करण्यात आले होते. कोरोना झाल्याचे निदान झाल्यानंतर या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पंजाबमधील सुवर्ण मंदिरात माजी हजुरी रागी आणि पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या 62 वर्षीय व्यक्तीला त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमृतसरमधील जीसीएमएच रुग्णालयात या व्यक्तीवर उपचार सुरू होते. कोरोनासदृश्य लक्षणे दिसून आल्याने तपासणी करण्यात आली.
त्या चाचणी रिपोर्ट आल्यानंतर पद्मश्री प्राप्त व्यक्तीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. अस्थमाचा त्रास असल्याने त्या व्यक्तीच्या जिवास धोका असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली होती. प्रकृती ढासळल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. बुधवारी करोना झाल्याचे निदान झाल्यानंतर गुरूवारी या व्यक्तीचा मृत्यू झाला. पंजाबच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी ही माहिती दिली.