बहुजननामा ऑनलाइन टीम –
राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. आज पिंपरी चिंचवड शहरातून दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1163 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत शहरात 33 हजार 272 रुग्ण बरे झाले आहेत.
महानगर पालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासामध्ये पिंपरी चिंचवड शहरात 1240 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 47 हजार 660 वर पोहचली आहे. शहरात आढळून आलेल्या 1240 रुग्णांपैकी 1144 रुग्ण शहरातील असून 96 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहराबाहेरील 866 रुग्णांवर सध्या पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान शहरात एकाच दिवशी 14 जणांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या 1044 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 862 तर शहराबाहेरील 182 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेल्या 14 रुग्णांमध्ये 10 रुग्ण हे मनपा हद्दीतील आहेत तर 4 रुग्ण हे हद्दीबाहेरील आहेत.
शहरामध्ये सध्या 5 हजार 756 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील 287 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. शहरात गेल्या 24 तासात चिखली, पिंपरी, पिंपळे गुरव, खराळवाडी, निगडी, भोसरी, अहमदनगर, चाकण, येलवाडी, बालेवाडी येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.