नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोना व्हायरस मोठया प्रमाणात पसरला असून आता त्याची दोन पॉजिटीव्ह प्रकरणे भारतातही आढळली आहेत. दिल्लीत एक प्रकरण सापडले असून दुसरे प्रकरण तेलंगणामध्ये आढळले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. दिल्लीमध्ये ज्या व्यक्तीची कोरोनाची सकारात्मक चाचणी समोर आली तो नुकताच इटली दौऱ्यावरून आला असून तेलंगणामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेली व्यक्ती दुबईवरून आली होती. कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आणि त्यापासून बचाव करण्याचा उपाय जाणून घेणे महत्वाचे आहे.
काय आहेत सुरुवातीची लक्षणे?
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णामध्ये सुरुवातीला ताप येणे आणि खूप थकवा जाणवणे यासारखी सामान्य लक्षणे आढळून येतात. रुग्णाला कोरडा खोकला होतो. पण अनेक जणांमध्ये अतिसारासारख्या तक्रारीही आढळल्या आहेत. रुग्णाच्या घशात समस्या उद्भवतात. या व्हयरसच्या जेनेटिक मटेरियलला पॉलिमर चेन रिएक्शनद्वारे ओळखले जाऊ शकते. कोरोनाची लागण झालेल्या काही रूग्णांची सीएटी स्कॅनरद्वारे तपासणी केली असता त्यांच्या फुफ्फुसात काही डाग दिसून आले. वैद्यकीय भाषेत याला ‘ग्राउंड ग्लास’ असे म्हणतात.
कोणाला आहे जास्त धोका?
कोरोना विषाणूची लागण झालेल्या केवळ २५ टक्के लोकांना आयसीयूमध्ये दाखल केले गेले असून ते एक्यूट रेस्पीरेटरी डिसट्रेस सिंड्रोमचे बळी झाले आहेत. अशा परिस्थितीत फुफ्फुसांमध्ये एक प्रकारचा द्रव भरला जातो आणि ऑक्सिजन पोहोचत नाही. तसेच मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे एखाद्याचा मृत्यू होतो.
कोरोनामुळे होत आहे मृत्यू-
एकीकडे चीनमध्ये अनेकजण मृत्युमुखी पडत असून दुसरीकडे इराण आणि इटलीमध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या दोन देशातही या व्हायरसमुळे मृतांचा आकडा वाढत असून आतापर्यंत चीनमध्ये २८०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७९ हजारांहून अधिक लोक अद्याप कोरोनाने ग्रस्त आहेत. इराणमध्ये कोरोनामुळे संसर्ग झालेल्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत असून तिथे ९७८ लोकं कोरोनाच्या कचाट्यात आहेत. तर इटलीमध्ये कोरोनामुळे २९ लोकांचा मृत्यू झाला असून अमेरिकेत कोरोनामुळे २ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे.