भोपाल : बहुजननामा ऑनलाईन – मध्य प्रदेश पोलीसांनी एका रिटायर्ड सब इन्स्पेक्टरविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कपिलदेव सिंह यांनी बनावट मार्कशीटच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप आहे. त्यांनी 38 वर्षे नोकरी केली आणि 2018 मध्ये ते रिटायर्ड झाले.
बिहारच्या नालंदा येथील रहिवाशी असलेले अखिलेश सिंह यांनी खरगोन एसपी यांच्या समक्ष एप्रिल 2019 मध्ये कपिलदेव सिंह यांच्याविरूद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. प्राथमिक तपासानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.
अखिलेश सिंह यांच्या मुलीचा विवाह आरोपी कपिलदेव सिंह यांचा मुलगा अजय सोबत झाला होता. यापूर्वी अखिलेश सिंहने आरोपी आणि आपल्या जावयावर मुलीच्या हत्येचा आरोप सुद्धा केला होता. दोघांना याप्रकरणी अटकदेखील करण्यात आली होती. नंतर त्यांना कोर्टाकडून जामीन मिळाला. त्यानंतर एप्रिलमध्ये बनावट मार्कशीटच्या अधारावर नोकरी मिळवण्याचा आरोप करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी रणवीर सिंह यांनी सांगितले की, तक्रारीनंतर पटनाच्या रसूलपुर येथील श्री शंकर सिंह हायस्कूलमध्ये एक टीम पाठवण्यात आली होती. कपिलदेव सिंह यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, 1971 मध्ये त्यांनी येथून आठवीची परीक्षा पास केली होती, परंतु शाळा प्रशासनाने याचे खंडन केले आहे.
तपास अधिकार्याने सांगितले की, कपिलदेव सिंह यांनी 1980 मध्ये खरगोनमध्ये कॉन्स्टेबलची नोकरी जॉईन केली होती. सब इन्स्पेक्टर पदावर असताना 2018 मध्ये ते रिटायर्ड झाले. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार आहे.