नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या जगभरात कोरोनाची दहशत असून या व्हायरसचा इतरही देशात रुग्ण आढळले असल्यामुळे खळबळ उडाली आहे. आता जपानमध्येही या विषाणूच्या संसर्गामुळे एक व्यक्ती गेला असून क्रूझवर कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहे.
या व्हायरसने जपानमध्ये पहिला बळी घेतला असून जपानचे आरोग्यमंत्री कात्सुनोबू कातो यांनी माहिती दिली आहे. ८० वर्षाच्या एका महिलेला रग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच तिच्या वैद्यकीय चाचणीत कोरोनाची लागण असल्याचे आढळले आहे. त्या महिलेचा मृत्यू अहवाल येण्याआधीच झाला आहे. ती महिला टोकियोजवळच्या एका शहरात राहायला होती. तसेच जपानसह हाँगकाँग आणि फिलीपिन्समध्येही प्रत्येकी एका नागरिकाचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला असल्याचे समजले आहे.
जपानमधील योकोहामा येथील बंदरावर डायमंड प्रिन्सेस क्रूझवर कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून आणखी २८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत तरी क्रूझवर २१८ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यात दोन भारतीयांचाही समावेश आहे. त्या क्रूझवरील काही सुरक्षा अधिकाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले आहे. या क्रूझवर एकूण ३७११ जण असताना क्रूझवर हाँगकाँगवरून आलेल्या एका प्रवाशामुळे कोरोना झाला असून क्रूझवर १३८ भारताचे नागरिक होते. त्याच्याच सुटकेसाठी भारतीय दूतावास जपान सरकारच्या संपर्कात आहेत.