नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात कोरोनाचा कहर सुरु आहे. दिवसेंदवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. अशातच मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनामुळे शुक्रवारी (दि.2) येथील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या दोन तासांच्या अंतराने कोरोनाने बापलेकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शाम श्रीधर पेंडलवार (वय 28) आणि श्रीधर गोविंदराव पेंडलवार (वय 67 रा. श्रीकृष्णनगर, मानेवाडा परिसर, नागपूर) असे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बापलेकांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पेंडलवार कुटुंबातील बापलेकाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला त्यांची प्रकृती ठिक होती, त्यामुळे त्यांच्यावर घरातच उपचार केले जात होते.
मात्र शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास मुलगा शाम पेंडलवार याची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीचं त्याचे निधन झाले. मुलाच्या मृत्यूनंतर 2 तासाने सकाळी 10 च्या सुमारास वडील श्रीधर यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. उपचारापूर्वी त्यांचाही मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील बापलेकाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने पेंडलवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.