अकोला बहुजननामा ऑनलाईन – तलाठी पदाची राज्यभरात परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेत कानाला ब्लु टुथ हेडफोन लावून कॉपी करण्यात आल्याचा प्रकार मलकापूर येथील परीक्षा केंद्रावर समोर आला आहे. याप्रकऱणी पोलिसांनी परीक्षार्थीला अटक केली असून न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली आहे.
हर्षल विजय तायडे (वय २०, रा. वडाळी, ता. मेहकर, जि. बुलडाणा) असे त्या तरुणाचे नाव आहे.
राज्यभरात महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून तलाठी पदासाठी परीक्षा घेतल्या जात आहेत. मलकापूर येथील बालाजी विद्यामंदिर कॉन्वेंट या ठिकाणी हर्षल तायडे हा शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास कानाला मोबाईल ब्लूटुथ लावून संगणकावर पेपर सोडवत होता. त्यावेळी त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होती. तो कानावर हात ठेवून बोलत असल्याने केंद्र प्रमुख मोहन कांबळे यांना त्याचा संशय आला. त्यांनी व केंद्र निरीक्षक विजय खेडेकर यांनी त्याची तपासणी केल्यावर तो मोबाईल ब्लूटुथद्वारे कॉपी करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर केंद्रप्रमुखांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.