नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – नागपूर महानगर पालिकेच्या वतीने संविधान चौकात उभारण्यात येणार असलेल्या संविधान उद्देशिका शिलालेख कार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. २३ लाख रुपयांच्या निधीमधून साकारण्यात येणाऱ्या संविधान उद्देशिका शिलालेखाची उंची सुमारे १८ ते २० फूट राहणार असून या स्मारकाचे बांधकाम पिवळ्या व लाल सॅण्डस्टोनने करण्यात येईल. यामध्ये संविधानाची प्रास्ताविका मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये पॉलीमार्बल दगडावर कोरलेली असेल. या स्मारकाची प्रतिकृती संसद भवनाप्रमाणे राहील. संविधाच्या प्रतिकृतीवर राजमुद्रा असलेले अशोक स्तंभ असणार आहे.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. आमदार प्रा. अनिल सोले, पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख, उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, बसपा पक्षनेते मोहम्मद जमाल, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती तथा कर व कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, नगरसेविका चेतना टांक, नगरसेवक अमर बागडे यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी व अधिकारीही उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्यवरांनी संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यानंतर प्रस्तावित संविधान उद्देशिका शिलालेखाचे भूमिपूजन केले. संचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले. आभार साहाय्यक आयुक्त महेश मोरोणे यांनी मानले.