बहुजननामा ऑनलाइन टीम – काँग्रेसच्या विचारधारेशी शेवटपर्यंत एकनिष्ठ असलेले माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर(Vilaskaka Undalkar) (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे सातारा येथे निधन झाले. त्यांनी दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघाचे तब्बल ३५ वर्षे प्रतिनिधीत्व केले होते. आज दुपारी कराड तालुक्यातील उंडाळे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
विलासकाका उंडाळकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत १२ वर्षे विविध खात्यांचे मंत्रिपद सांभाळले. सहकार, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. उंडाळकर यांनी सहकार क्षेत्रातही मोठे काम केले.
त्यांनी अनेक सहकारी संस्था उभारल्या. त्यांनी दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघाचे सलग ७ वेळा म्हणजेच सलग ३५ वर्षे प्रतिनिधीत्व केले. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात निवडणुक लढविली होती. त्यात चव्हाण विजयी झाले होते.