मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज यांच्या सभांची जोरदार चर्चा होती तसेच त्यांच्या सभेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसला याची दखल काँग्रेस आणि राष्ट्रवादीला घ्यावी लागेल. अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांना आघाडीत सामील करून घेण्याबाबतचे संकेत दिले. मात्र, राज ठाकरेंबरोबर या विषयासंदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचे पवार यांनी सांगितले .
राज ठाकरे यांनी ‘लावरे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपवर टीकेची झोड उठविली होती. या पर्श्वभूमीवर एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत महाआघाडी सत्तेत येण्यासाठी जी समीकरणे जुळवावी लागतील, त्यावर राज ठाकरेंच्या सभांचा विचार करावा लागेल जसे बाळासाहेब ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहायचे, ते आपला शब्द पाळायचे. त्यांचे प्रतिबिंब राज ठाकरेंमध्ये दिसत आहे.
उद्धव ठाकरें यांनी भाजपसोबत युती करणार नसल्याची घोषणा पंढरपूरच्या सभेत केली होती. मात्र त्यांनी आपली भूमिका बदलत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने भाजपसोबत युती केली. त्यामुळे शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाच्या प्रतिमेला मोठा तडा गेल्याचे पवार म्हणाले. दरम्यान , याबाबत राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.