वृत्तसंस्था – दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ज्येष्ठ वकील सौरभ किरपाल यांच्या पदोन्नतीबाबतच्या केंद्राच्या भूमिकेबद्दल सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी केंद्राला पत्र लिहून या प्रकाराबाबतची अधिक माहिती मागवली आहे. 2017 मध्ये पदोन्नतीसाठी किरपाल यांच्या नावाची शिफारस केली गेली होती.
दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाच्या कॉले़जियमच्या सूचनेनंतर गुप्तचर यंत्रणांनी किरपाल यांच्या पदोन्नतीच्या निर्णयावर स्थगिती आणली होती. किरपाल यांचा साथीदार जो एक परदेशी नागरिक आहे, त्यामुळे तो सुरक्षेला धोका ठरू शकतो, असे त्यात म्हटले होते.
याबाबत सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांना लिहिलेल्या पत्रात सौरभ किरपाल यांच्याबाबत अतिरिक्त माहिती मागितली आहे. जेणेकरून त्यांच्या बढतीबाबत लवकरच अंतिम निर्णय घेता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र ही सर्वोच्च न्यायालयाच्या कॉले़जियमची केंद्राकडे केलेली अधिकृत शिफारस नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 2 मार्चला झालेल्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या कॉले़जियमने या संदर्भात मुद्दाम विचार केला होता. परंतु केंद्राकडून अधिक माहिती प्राप्त होईपर्यंत आपला निर्णय त्यांनी पुढे ढकलला होता. ऑक्टोबर 2017 मध्ये दिल्ली हायकोर्टाच्या कॉले़जियमने सर्वानुमते त्यांच्या नावाची शिफारस केली होती. तेंव्हापासून किरपाल यांच्या बढतीबाबतचा हा निर्णय चौथ्यांदा स्थगित केला आहे.