पुणे : बहुजननामा ऑनलाईन – बाणेर येथील चार चाकी गाड्यांच्या रेनॉलट सर्व्हिस सेंटरला पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत चार गाड्या आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे. बाणेर परीसरत हे रेलॉलट सर्व्हिस सेंटर (Renault Service Centre) आहे. चार चाकी वाहने सर्व्हिसिंगचे काम केले जाते. मोठ्या शेडमध्ये हे सेंटर आहे.
दरम्यान यात जुने तसेच नवीन टायर व गाड्यांचे पार्ट मोठ्या प्रमाणात होते. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली. तात्काळ पाषाण अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग तोपर्यंत मोठ्या प्रमाणात भडकली होती. या सर्व्हिस सेंटरमध्ये दुरूस्तीस आलेल्या 5 कार देखील होत्या.
पाण्याचा मारा करून अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. पण या आगीत साहित्य आणि टायर जळून खाक झाले आहे. तसेच, दुरूस्तीस आलेल्या कारचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. आग नेमकी का लागली हे समजू शकलेले नाही.