नवी दिल्ली : बहुजननाम ऑनलाईन – दिल्लीत “ श्री छत्रपती शिवाजीमहोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीच्यावतीने 15 ते 19 फेब्रुवारी 2019 दरम्यान हा महोत्सव साजरा होणार आहे.त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. दिल्लीतील कॉन्स्टिटयुशन क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्री छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीचे महासचिव निवृत्त कर्नल मोहन काकतीकर यांनी आज ही माहिती दिली.
पहिल्या दिवशी 15 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द वक्ते व इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांचे “शिवाजी महाराजांच्या जीवनगाथेवर’ व्याख्यान होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व आतापर्यंत 700 हून जास्त प्रयोग झालेले “शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक 16 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. विद्रोही शाहीरी जलसा व रंगमाळा यांचे सादरीकरण असणाऱ्या या नाटकाची संकल्पना व गीत प्रसिध्द शाहीर संभाजी भगत यांचे आहे.
याच दिवशी जागतिक किर्तीचे कलाकार एस.बी.पोलाजी व कलाकारांचा समूह यांनी रेखाटलेल्या “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत’ रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तर राजौरी गार्डन परिसरातील शिवाजी महाविद्यालयात “आधुनिक भारतात शिवाजी महाराजांचे मूल्य व वारसा यांचे महत्व’ या विषयावर आंतर महाविद्यालयीन वाद -विवाद स्पर्धा होणार आहे.
स्वरभारती प्रस्तुत “शिव कल्याण राजा’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन 17 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. प्रसिध्द गायक व संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर व अन्य कलाकार संगीतमय प्रस्तुती देतील तर विद्यावचस्पती शंकर अभ्यंकर या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. मिंटो रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयाला पुष्पार्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जंयती दिनी 19 फेब्रुवारी रोजी या महोत्सवाची सांगता होणार आहे.