मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सारथी संस्था वाचवण्यासाठी, मराठा समाजातील तरुणांच्या हक्कासाठी आयुष्यात पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर करून त्यांनी त्याबाबतचे निवेदन दिले आहे.
याबाबत संभाजीराजे यांनी आपल्या फेसबुकवर लिहिले आहे. तसेच मागील अनेक दिवस ते या प्रकरणात लक्ष घालत असल्याचे सांगत या संस्थेचे उदघाटन त्यांच्या अध्यक्षतेखाली झाले असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर तात्काळ मार्ग काढण्याचा शब्दही दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या दिवशी मी सारथीच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन दोन्ही बाजूंची भूमिका घेतली आणि सरकार स्थिरस्थावर होईस्तोवर कुठलाच नवीन आदेश न काढण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु जे.पी. गुप्ता हे प्रधान सचिव दररोज नवीन आदेश काढून संस्थेला बदनाम करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना अशी कोणती घाई झाली आहे, की दररोज आदेश काढत आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ११ जानेवारीपासून सारथी कार्यालयाजवळ अनेक कार्यकर्ते आणि सारथीच्या लाभार्थ्यांसोबत उपोषणाला बसणार असल्याचेही संभाजीराजे यांनी सांगितले.