औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकिय घडामोडींना राज्यात वेग आला आहे. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी प्रकाश आंबेडकरांना सन्मानजनक जागा द्या मी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, असे वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी क़ॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी रविवारी दुपारी औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांसोबत तासभर चर्चा केली.
निर्धार परिवर्तन यात्रा घेऊन ते बुलढाणा येथे पोहचल्यानंतर यात्रा सोडून ते रविवारी औरंगाबादला रवाना झाले. त्यांनी रविवारी दुपारी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्य़ांशी तासभर चर्चा केली. या बैठकील भुजबळांसह आमदार बळीराम सिरस्कर, आमदार सतीश चव्हाण, आमदार हरिदास भदे, माजी आमदार विजय मोरे, प्रा. किसन चव्हाण प्रा. सदानंद माळी आदी नेते उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीसोबत महाआघाडी करताना किती जागा हव्या आहेत याचा अंदाज भुजबळांनी या बैठकित घेतला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आता राज्यातील राजकिय घडामोडींना वेग आला आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीने भाजपला टक्कर देण्यासाठी आघाडी करण्याची तयारी दर्शलवली आहे. प्रकाश आंबेडकर यांचा अनेक जागांवर प्रभाव आहे. त्यासाठी त्यांना सोबत घेण्यासाठी कॉंग्रेस इच्छुक आहे. तसेच मागील काही दिवसांपुर्वी प्रकाश आंबेडकारांनी छगन भुजबळ यांची मुंबईत भेट घेतली होती. या भेटीनंतर भुजबळ हे शरीराने राष्ट्रवादीत असले तरी मनाने वंचित बहुजन आघाडीसोबत आहेत असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे आंबेडकरांशी बोलणी करण्यास मराठा नेते कचरत आहे. भुजबळ ओबीसी वर्गातून येतात. त्यामुळे भुजबळांनी पुढाकार घेतल्याचे कळते. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या महाआघाडीत वंचित बहुजन आघाडीला आणण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर सोपविण्यात आल्याचे सुत्रांकडून समजते.