भोकर :-(माधव मेकेवाड): शहराचे सुशोभिकरणं करण्यासाठी नगर परिषदेचा निधी कमी पडतोय का ? म्हणून एक सामाजिक उपक्रम राबिवणारी संस्था यांनी चक्क शहरात मुख्य डांबर रस्त्यावरच 3 फूट खड्डे खोदुन झाडे लावण्यासाठी जागा केल्याने अनेक अडचणी समोर आल्या आहेत.भोकर शहरातून जात असलेल्या राज्य महामार्ग क्र.२५१ चे काम सुरु असून नव्यानेच करण्यात येत असलेल्या या रस्त्यावर क्रांतिगुरु लहुजी साळवे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याच्या कारणाआड पक्क्या नुतन रस्त्त्यावर विना परवाना खड्डे खोदून शासकीय मालमत्तेचे लाखोचे नुकसान करुन रस्ता कमकुवत केला असल्याने सार्वजिनक बांधकाम उपविभागाने भोकर नगर परिषदेष नोटीस बजावली असून सदरील प्रकरणातून नगर परिषदेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. भोकर शहरातून जात असलेल्या हदगाव-तामसा- भोकर- उमरी राज्य महामार्ग क्र.२५१ वरील क्रांतिगुरु लहुजी साळवे चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक-डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक-विश्रामगृह-तामसा टी पॉईंट या रस्त्याचे व उड्डान पुलाचे काम सुरु असून अपुर्ण असल्याने हा रस्ता भोकर सार्वजनिक बांधकाम विभागाने हस्तांतरीत केलेला नाही.असे असतांनाही झाडे लावण्याच्या कारणाआड क्रांतिगुरु लहुजी साळवे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरील मजबूत डांबरीकरण केलेल्या नुतन रस्त्यावर दुतर्फा जेसीबी ने मोठमोठी खड्डे खोदण्यात आली आहेत. ती पण चुकीच्या ठिकाणी.
या खड्ड्यांमुळे रुंदीकरण केलेला रस्ता अरुंद व कंमकुवत झाला असून रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे.रस्त्यावर अतिक्रमण करणा-यांस याचा आधार देखील झाला आहे.तसेच नांदेड – मुदखेड – भोकर- हदगाव – किनवट या राज्य महामार्गावरील भोकर शहरातून जात असलेल्या शासकीय विश्रामगृह ते प्रफुल्ल नगर व शनिदेव मंदीर मार्गे मुदखेड या रस्त्यावर ही दुतर्फा खड्डे खोदण्यात आले आहेत. मागील वर्षीच या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले होते व रुंदीकरणाचे काम झाले आहे.तर नांदेड -मुदखेड पर्यंत नुतन काम झाले असून भोकर पर्यंत रस्ता नुतनीकरणाचे काम लवकरच करण्यात येणार आहे.त्यामुळे सदरील खड्यात लावलेली झाडे परत एकदा तोडावी लागणार आहेत. भोकर शहरात उपरोक्त ठिकाणी खड्डे खोदण्यात आली व झाडे लावण्याचा खटाटोप केला आहे.परंतू हे करतांना सार्वजनिक बांधकाम उपविभाग भोकर व राज्य महामार्ग विशेष प्रकल्प यांच्या कसल्याही परवानग्या घेण्यात आल्या नाहीत.हे निदर्शनास आल्याने सा.बां.उपविभाग भोकर कार्यालयाने दि.२६ जून २०१९ रोजी नगर परिषद भोकर ला नोटीस बजावली असून खड्डे खोदण्याचे काम थांबविले आहे.
त्या नोटीसीमध्ये सदरील कार्यालयाची कसलीही परवानगी न घेता डांबरीकरण केलेला रस्ता विनापरवाना खोदून नुकसान केले असून रस्ता कमकुवत करण्यात आला असल्याचे नमुद करण्यात आले आहे.तसेच रस्ता कमकुवत झाल्याने भविष्यात होणा-या नुकसानीची जबाबदारी नगर परिषदेची राहील त्यामुळे सदरील खड्डे तात्काळ बुजविण्यात येऊन जैसे थे करुन द्यावे असे नमुद करण्यात आले आहे.यामुळे सदरील खड्डे प्रकरणी भोकर नगर परिषदेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. याबाबद सा.बां.उपविभाग कार्यालयात संपर्क साधला असता सहाय्यक अभियंता बाहेकर यांनी म्हटले आहे की,सदरील खड्डे आमच्या कार्यालयाची कसलीही परवानगी न घेता विना परवाना गैर ठिकाणी खोदण्यात आल्याने आम्ही नोटीस बजावली असून पुढील काम थांबविले आहे.तसेच ते खोदलेले खड्डे बुजवून रस्ता पर्ववत करावा असे सांगीतले आहे.तसे न केल्यास शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्याने ती नुकसान भरपाई वसूल करण्यात येईल.तसे न झाल्यास योग्य ती कारवाई करु असे सांगण्यात आले.