अमरावती : बहुजननामा ऑनलाइन – २० जानेवारीला अमरावतीत होऊ घातलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेकरिता मैदान नाकारल्याचा आरोप करीत भारिप-बमसंचे प्रदेश महासचिव गुणवंत देवपारे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते जिल्हा परिषदेवर धडकले. सीईओंच्या अनुपस्थित अध्यक्ष आणि अतिरिक्त सीईओंच्या दालनात ठिय्या देण्यात आला.
तीन तास होऊनही मैदानाबाबत तोडगा निघत नसल्याने कार्यकर्त्यांनी अतिरिक्त सीईओंना घेराव करून सीईओंच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आणि कार्यकर्त्यांनी स्वत: अधिकाऱ्यांसह दालनात कोंडून घेतले.
अमरावतीमध्ये २० जानेवारीला बाळासाहेब आंबेडकर आणि ओवीसी यांची जाहीर सभा असल्याने याकरिता सायन्सकोर मैदान भाड्याने देण्याबाबतचा अर्ज पक्षाच्या वतीने २७ डिसेंबर रोजीच दिला होता. त्यानंतर पुन्हा ५ जानेवारीला दुसरा अर्ज देण्यात आला. परंतु सीईओंनी वंचित बहुजन आघाडीच्या अर्जाचा विचार न करता ७ जानेवारीनंतर कृषी मेळाव्याकरिता आलेल्या अर्जावर विचार करीत त्यांच्याकरिता १७ ते ३१ जानेवारीपर्यंतची मैदान देण्याची परवानी दिली आणि रजेवर निघून गेल्या. ही बाब पदाधिकाऱ्यांना माहिती होताच त्यांनी प्रथम अध्यक्षांना गाठून मैदान २० जानेवारीला उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासीत केले.