जात प्रमाणपत्रासाठी मराठा महासंघातर्फे मार्गदर्शन शिबिर

January 18, 2019


कोल्हापूर :  बहुजननामा ऑनलाइन – योग्य कागदपत्रे असल्यास प्रशासन तत्काळ दाखले देते, त्यामुळे नागरिकांनी फसवणूक करणाऱ्यांच्या नादी न लागता कायदेशीर बाबींची पूर्तता करून दाखले काढावेत, असे आवाहन करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले. ते अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित मराठे दाखले मार्गदर्शन शिबिरात शाहू स्मारक भावन येथे बोलत होते. 

प्रांताधिकारी सचिन इथापे म्हणाले, सध्या दररोज तीनशेहून अधिक मराठा समाजाचे दाखले दिले जातात. दाखल्यासाठी एखादा अर्ज आमच्याकडे आल्यास एक दिवसांत त्याच्यावर सही केली जावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. त्यामुळे अर्ज करणाऱ्यांना तत्काळ दाखले सध्या मिळत आहेत. महा-ई सेवा केंद्रांनी ही लोकांना अधिक फेऱ्या मारण्यास लावता, तसेच त्यांच्याकडून योग्य शुल्क आकारून दाखले द्यावेत. अधिक शुल्क आकारणाऱ्या ई-सेवा केंद्र चालकाची तक्रार करावी, अशा केंद्र चालकांवर कडक कारवाई करण्यात येईल. 

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, मराठा समाजासाठी मोठ्या तत्परतेने प्रशासनाकडून दाखले देण्यात येत आहेत. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे सादर करून समाज बांधवांनी दाखले काढावेत. महा-ई सेवा केंद्राच्या माध्यमातून दाखले काढणे सोपे आहे. मात्र दाखला काढून देण्यासाठी केंद्र चालकांनी योग्य शुल्क आकारून दाखले द्यावेत, अन्यथा त्यांच्या विरोधात आवाज उठवला जाईल. यावेळी उपस्थितांनी आपल्या प्रश्न आणि शंका मांडल्या. त्या शंका आणि प्रश्नांचे अधिकाऱ्यांनी तत्काळ निरसन केले. कार्यक्रमास इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, शैलजा भोसले, चंद्रकांत चव्हाण, शंकरराव शेळके, किशोर घाटगे आदी उपस्थित होते.