नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेसने आज पत्रकार परिषद घेत अरुणाचल प्रदेशचे भाजपाचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहे. पेमा खांडू यांच्या ताफ्यातून 1.80 कोटी रुपयांची रक्कम जप्त केल्याचा व्हिडिओ काँग्रेसने दाखवला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी हा व्हिडिओ पत्रकार परिषदेत दाखवला आहे. रणदीपसिंह सुरजेवाला हे या पत्रकार परिषदेत बोलत होते. चौकीदाराची चोरी रंगेहात पकडल्याची टीका रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केली आहे. काल रात्री 12 वाजताच्या सुमारास ही रक्कम पकडल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असल्याचं समजत आहे. अशातच ही रक्कम पकडल्याचा व्हिडिओ काँग्रेसने समोर आणला आहे. या व्हिडिओमध्ये 1.80 कोटींची रक्कम पकडली असून पोलीस याबाबत कारवाई करताना दिसत आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना, आजचा दिवस हा काळा दिवस आहे असे रणदीपसिंह सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. भाजपाचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी मागणीही सरजेवाला यांनी केली.
यावेळी बोलताना रणदीपसिंह सुरजेवाला म्हणाले की, “लोकांचे मत विकत घेऊन मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी ही रक्कम अरुणाचल प्रदेशात आणली गेली आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. निवडणूक आयोगाने याची दाखल घ्यायला हवी” असे सुरजेवाला म्हणाले आहेत.