सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारसभेत एमआयएमच्या एका माजी लोकप्रतिनिधींनी सोलापुरात ‘छोटय़ा पाकिस्ताना’चा शोध लावणारे वक्तव्य केले आहे. त्यामुळे वादही उफाळून आला आहे.हे वादग्रस्त विधान असलेली गायकवाड यांच्या भाषणाची चित्रफीत समाज माध्यमांतही चांगलीच फिरू लागली आहे
सोलापूर शहरातील नई जिंदगी चौक परिसरात रात्री वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत एमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता. या प्रचार सभेचे ठिकाण बहुतांशी अल्पसंख्याक समाजाचे बहुबल होते. हा धागा पकडताना माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी, येथे एमआयएमच्या सक्रिय समर्थनामुळे केवळ वंचित बहुजन आघाडीचाच प्रभाव असेल. कारण हा ‘छोटा पाकिस्तान’ आहे, असे विधान केले. आश्चर्य म्हणजे व्यासपीठावर उपस्थित अन्य नेते मंडळींनी गायकवाड यांचे हे विधान हसण्यावर नेले, तसे समोरील जनजमुदायातून शिट्टय़ा वाजल्या. गायकवाड यांच्या विधानाला कोणीही हरकत घेतली नाही.
परंतु या वादग्रस्त विधानाची चित्रफीत समाज माध्यमांतही चांगलीच फिरू लागली आहे. गायकवाड यांच्या पत्नी नूतन गायकवाड एमआयएमच्या नगरसेविका आहेत. स्वत: गायकवाड यांनी लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. परंतु नंतर आंबेडकरी समाजातून दबाव येताच त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्यासाठी आपली अपक्ष उमेदवारी मागे घेतली होती. दरम्यान, गायकवाड यांच्या या वादग्रस्त विधानाचे पडसाद प्रचारात उमटण्याची आणि त्यातून एमआयएमसह वंचित बहुजन आघाडी अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.