उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – अलीकडेच अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने अमेरिकन सिनेटमध्ये अहवाल सादर केला आहे. त्यात त्यांनी भापज हे लोकसभेच्या तोंडावर देशात जातीय दंगली घडविण्याच्या तयारीत आहे असे म्हटले आहे. त्यातच मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्या नेतृत्वातील भाजपाच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या ओम प्रकाश राजभर यांनी भाजपा देशात दंगली घडवेल, असं वादग्रस्त विधान केलं आहे.
ते भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज (एसबीएसपी) चे प्रमुख आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, बलियातल्या बांसडीहमधल्या सैदपुरा गावातील एका जनसभेला संबोधित करताना राजभर यांनी हे विधान केलं आहे. ते म्हणाले, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या अहवालात सांगितलं आहे की, भाजपा देशात दंगली घडवेल, देशात दंगली होऊ शकतात, त्यामुळे जनतेनं हिंदू-मुस्लिमांच्या नावानं भांडू नये, दंगलीत कोणत्याही नेत्याचा नव्हे, तर सामान्य व्यक्तीचाच जीव जातो, असंही त्यांनी अधोरेखित केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपा हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर पुढे गेल्यास भारतात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच दंगली होतील. अमेरिका प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला हा अहवाल प्रसिद्ध करते. ज्यात देशभरातील घटनांचं मूल्यांकन केलेलं असतं.