मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असणारा सत्तासंघर्ष संपून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकासआघाडी सरकार स्थापन झालं आहे. या सर्व राजकीय नात्यात सगळ्यात जास्त जागा मिळूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील पक्षांतर्गत नाराजी समोर येत असल्याचं दिसून येत आहे. ‘सिंचन घोटाळ्याचे पुरावे रद्दीला विकले तसेच जर राज्यातील नेतृत्वाने विनोद तावडे, चंद्रकांत बावनकुळे, मला सोबत घेऊन पुढे गेले असते तर किमान भाजपाच्या २५ जागा निवडून आल्या असत्या अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर टीका केली होती. आता एकनाथ खडसेननंतर भाजपातील प्रसिद्ध चेहरा असलेल्या पंकजा मुंडेही भाजपात नाराज असल्याचं बोललं जातं आहे.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी फेसबुकवर केलेल्या पोस्टमुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ माजली आहे. पुढे काय करायचं ? कोणत्या मार्गाने जायचं, हे ठरविण्यासाठी येत्या १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर येण्याचं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यामुळे १२ डिसेंबरला पंकजा मुंडे कोणता मोठा निर्णय करणार यावर चर्चा रंगू लागली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी आपल्या हॅण्डलवरून भाजपा नावाचा उल्लेख काढून टाकला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपा सोडणार कि काय अशीही चर्चा सुरु झाली आहे. सध्या पंकजा मुंडे आणि बहुजन समाजातील काही लोकप्रतिनिधी मिळून वेगळा गट तयार करण्यावर एकमत झाले आहे असल्याची माहिती आहे.
तर आजच्या सामना अग्रलेखात शिवसेनेने केलेल्या वक्तव्यामुळेही अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अग्रलेखात म्हटलं की, ‘भाजपाने बहुजन समाजाचा चेहरा गमावला असून जनता त्यांच्यापासून दूर गेली आहे. आज विरोधी पक्ष म्हणून जो आकडा त्यांच्या भोवती दिसत आहे, तो टिकवणे यापुढे अवघड जाणार असे चित्र दिसत आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाने पार पाडली असती तर आम्ही जे सांगतो त्यावर मोहोर उठली असती. १७० चे बहुमत साधे नाही व उद्या हा आकडा १८५ पर्यंत पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जे घडू पाहत आहे तो सर्व प्रकार म्हणजे भाजपाचे ‘कर्मफळ’ आहे.’ या सर्वच प्रकरणांमुळे देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात पंकजा मुंडे यांनी रणनीती आखणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे . परंतु सध्यातरी पंकजा मुंडे १२ डिसेंबरला काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.
Visit : bahujannama.com