नवी दिल्ली वृत्तसंस्था – सत्ताधारी भाजप वर्षभरात मालामाल झाली असून वर्षभरात भाजपच्या संपत्तीत २२ टक्क्यांची वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर याच काळात कॉंग्रेसच्या संपत्तीत १५ टक्क्यांची घट झाली आहे. यासंदर्भात असोसिएशन ऑफ डेमोक्रेटीक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने २०१६-१७ ते २०१७-१८ या कालावधीतील आकडेवारी जाहिर केली आहे. कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, बहुजन समाज पक्ष, सीपआय, सीपएम या पक्षांनी त्यांच्या संपत्तीची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. मात्र ही माहिती देताना पक्षांनी अनेक नियमांचं उल्लंघन केलं असल्याचे एडीआरने म्हटले आहे.
या अहवालात सात राष्ट्रीय पक्षांच्या घोषित संपत्ती, देणगीदार यांची माहिती दिली गेली आहे. एडीआरकडून दरवर्षी अशा अहवाल तयार केला जातो. यावेळी तयार केलेल्या अहवालात भाजपची संपत्ती २२.२७ टक्क्यांनी वाढल्याचे आकडे समोर आले आहेत.
भाजपची एकूण संपत्ती १४८३ कोटी
सत्तारुढ भाजपची संपत्ती सर्वात जास्त आहे. त्यात २२.२७ टक्के वाढ झाली आहे. २०१६-१७ मध्ये भाजपची एकूण संपत्ती १२१३.१३ कोटी होती. ती २०१७-१८ मध्ये ती १४८३.३५ कोटी रुपयांवर गेली आहे.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संपत्तीत घट
सर्वात मोठी घट कॉंगेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष या दोन राष्ट्रीय पक्षांच्या संपत्तीमध्ये घट झाली आहे. कॉंग्रेस पक्षाची संपत्ती २०१६-१७ या वर्षात ८५४.७५ कोटी रुपये होती. तर २०१७-१८ या वर्षात या संपत्तीत घट होऊन ती ७२४.३५ कोटी रुपयांवर आली आहे. कॉंग्रेसच्या संपत्तीत १५.२६ टक्के घट झाली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची संपत्ती २०१६-१७ मध्ये ११.४१ कोटी रुपये होती. तर २०१७-१८ मध्ये ती १६.३९ टक्क्यांनी घटून ९.५४ कोटी रुपये झाली आहे.
तृणमूल कॉंग्रेसच्या संपत्तीत १०.८६ टक्के वाढ
तृणमूल कॉंग्रेस पक्षाची संपत्ती २०१६-१७ मध्ये २६.२५ कोटी रुपये होती. तर २०१७-१८ या वर्षात ती वाढून २९.१० कोटी रुपये झाली आहे.