बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे महापालिकेमध्ये शिक्षण समितीची स्थापना करण्यात येणार असून या समितीच्या अध्यक्षपदी नगरसेविकेची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच महापालिकेतील अन्य पदांबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.
भाजपने पुणे महापालिकेच्या सभागृह नेते पदी गणेश बिडकर यांची नियुक्ती केली. आज जगदिश मुळीक यांच्या उपस्थतीतीत नगरसेवकांच्या बैठकीत बिडकर यांना नियुक्तीचे पत्र दिले. तर मावळते सभागृह नेते धीरज घाटे यांना पुन्हा संघटनेत शहराचे प्रभारी म्हणून पदभार देण्यात आला.
यानंतर पत्रकारांशी बोलताना मुळीक यांनी वरील माहिती दिली. स्वीकृत सदस्याची सभागृह नेतेपदी निवड, महिला सदस्यांना पदांचे वाटप या अनुषंगाने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर माहिती देताना मुळीक म्हणाले, की लवकरच शासनाच्या आदेशानुसार नगरसेवकांचा समावेश असलेली शिक्षण समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीचे अध्यक्षपद हे नगरसेविकेला देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
सभागृह नेते म्हणून धीरज घाटे यांनी उत्तमपणे जबाबदारी पार पाडली आहे. अधिकाधिक सदस्यांना संधी मिळावी यासाठी कामकाजाचा अनुभव असलेले गणेश बिडकर यांना संधी देण्यात आली आहे.
गणेश बिडकर म्हणाले, की भाजपने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. समान पाणीपुरवठा , नादिसुधार प्रकल्प ( जायका) , कचरा व्यवस्थापन यासारखे दीर्घकालीन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्राथमिकता देईन.
दरम्यान नगरसेवकांच्या बैठकीमध्ये जगदीश मुळीक यांनी पदवीधर निवडणुकी मध्ये जनतेने मतदान केले नाही. या निवडणुकीत पदवीधर आणि शिक्षकांचे मतदान होते. पुणे जिल्ह्यातून भाजपच्या उमेदवाराला चांगले मतदान झाले आहे. त्यामुळे या मतदार संघातील पराभवामुळे खचून न जाता 2022 मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी करा, असे आवाहन मुळीक यांनी केले. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह भाजपचे 6 आमदार, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.