दिसपूर :बहुजननामा ऑनलाइन टीम – सध्या पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. पण आता सरकारने या सर्वांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार, आता पेट्रोल-डिझेलचे दर 5 रुपयांपर्यंत कमी केले आहेत. याशिवाय दारूवर आकारले जाणाऱ्या शुल्कात 25 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे.
आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्यापार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. त्यानुसारच, आसाम राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात 5 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यासह आसाममध्ये दारूवर लागणाऱ्या शुल्कावर 25 टक्क्यांपर्यंत कमी केली आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोग या राज्यांतील निवडणूक कार्यक्रम 15 फेब्रुवारीनंतर जाहीर करेल असा अंदाज आहे. त्यानुसारच आता निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी दक्षिणेकडील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशचा दौरा करत आहेत.
फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये सुरुवात
निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला या राज्यांमध्ये निवडणूक घेतली जाऊ शकते. या राज्यांसाठी निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे.
तमिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीत एकाच टप्प्यात मतदान?
तमिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीत एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये 6 ते 8 टप्प्यांमध्ये मतदान घेतले जाण्याची शक्यता आहे.