मुंबई : बहुजननामा ऑनलाईन टीम – बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना हॅकरने ‘टार्गेट ‘ केल्याची घटना उघडकीस आली आहे. ‘बिग बीं’चे ‘ अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक करून अकाऊंटवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो झळकवण्यात आला आहे. अमिताभ बच्चन यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुंबई पोलिसांनी सायबर पथकाला याची माहिती दिली.
सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे काम पाकिस्तानचा पाठिंबा असणारा तुर्कीश हॅकर ग्रुप आयलदिज टीमने (Ayyildiz Tim) केले आहे. हॅकरने बच्चन यांचा फोटो हटवून त्याजागी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा फोटो लावला होता. हॅकरने बिंग बींचा बायोडाटाही बदलला आणि त्यात लव पाकिस्तान असे लिहिण्यात आले . सध्या बिग बींचे अकाऊंट पूर्ववत करण्यात आले आहे. तसेच हॅकरद्वारे करण्यात आलेले ट्वीटही हटवण्यात आले असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.