बहुजननामा ऑनलाईन
महाराष्ट्रातील भीमा-कोरेगाव प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) चौकशीसाठी गुरूवारी रांचीत राहणारे ज्येष्ठ मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना ताब्यात घेतले. सूत्रांनुसार, 83 वर्षांच्या स्वामींना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणात आपला कसालाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.
एजन्सीच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, स्वामी सीपीआय (माओवादी) चे सदस्य आहेत. स्वामींना सीपीआय (माओवादी) च्या कारवायांसाठी एका सक्रिय सहकार्याच्या माध्यमातून निधी प्राप्त झाला. त्यांच्याकडून भाकपा (माओवादी) च्या हालचाली आणि सीपीआय (माओवादी) च्या प्रचार वस्तू, साहित्य आणि प्रोपेगंडाशी संबंधित कागदपत्र जप्त केले आहेत.
एनआयएच्या दोन अधिकार्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला की, स्वामींना भीमा कोरेगावच्या तपासासाठी रांचीहून ताब्यात घेतले होते. मात्र, अधिकार्यांनी ही माहिती देण्यास नकार दिला की, त्यांची दुसर्यांदा चौकशी का केली जात आहे. त्यांचे म्हणणे आहे की, स्वामींना चौकशीसाठी गुरूवारी रांची येथील कार्यालयात बोलावण्यात आले होते आणि या प्रकरणात त्यांच्या भूमिकेबाबत चौकशी करण्यात आली.
हे प्रकरण 31 डिसेंबर 2017 च्या एल्गार परिषदच्या घटनेशी संबंधित आहे. यापूर्वी स्टॅन स्वामींची रांचीत 7 ऑगस्टला दोन तास चौकशी करण्यात आली होती आणि नंतर त्यांना पुढील चौकशीसाठी मुंबईच्या एनआयए कार्यालयात बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांनी एजन्सीला सांगितले होते की, वय आणि कोरोना व्हायरस महामारीच्या कारणामुळे ते प्रवास करू शकत नाहीत.