बहुजननामा ऑनलाईन – मुंबई उच्च न्यायालयाने बकरी ईद दिवशी देण्यात येणाऱ्या कुर्बानी संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने बकरी ईदसाठी फ्लॅट आणि सोसायटी परिसरात कुर्बानी देण्यास सक्त मनाई केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात बकरी ईदसाठी कत्तलखान्याबाहेर तसेच खासगी जागांसाठी देण्यात आलेल्या परवान्यांविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. ही याचिका प्राणीमित्र संघटनेकडून दाखल करण्यात आली होती.
या निर्णयामुळे फ्लॅट आणि सोसायटी परिसरात कुर्बानी देण्यास मुंबई महानगरपालिकेकडे आलेले सुमारे ८ हजार परवाने रद्द होणार आहेत. उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, सामुदायिक केंद्रात कुर्बानीची सोय असलेल्या ठिकाणी एक किलोमीटरच्या परिसरात कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीला स्वतंत्र परवानगी देऊ नये.
पालिकेने बकरी ईदसाठी ऑनलाईन जाहिरात दिली होती. तात्पुरत्या काळासाठी या जाहिरातीमधून बकरे कटाईचे परवाना देण्याचे सूचित करण्यात आले होते. मात्र काही प्राणीमित्र संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल करत या निर्णयाला आव्हान दिले होते.