औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणांमधील नववा संशयित आरोपी शरद कळसकर याला एसआयटी च्या विशेष पथकाने बुधवारी औरंगाबादेत घेऊन जात पुढील तपास केला. तेथून आरोपी शरद कळसकरला त्याच्या गावी घेऊन जाण्यात आले तेथील त्याच्या घर आणि शेताची झाडाझडती करून पंचनामे केले. जवळपास सुमारे तास भर हे पथक केसापुरीत होते. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी संशयित आरोपी शरद कळसकरला अटक केली होती. तेव्हापासून तो कारागृहात होता.
दरम्यान, पानसरे हत्याप्रकरणी विशेष तपास पथकाने कळसकरला अटक केली. न्यायालयाच्या आदेशानुसार कळसकर सध्या एसआयटीच्या ताब्यात आहे. एसआयटीचे निरीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सात ते आठ पोलिसांचे पथक कळसकरला घेऊन बुधवारी सायंकाळी औरंगाबादेत आले. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास हे पथक कळसकरचे गाव असलेल्या केसापुरी येथे गेले. तेथे विशेष पथकाने त्याच्या घर आणि शेताची झाडाझडती करत पंचनामे केले.