बहुजननामा ऑनलाइन टीम – पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. चालू वर्षांतही पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. शिऊर (ता. वैजापूर) पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या अंगावर वाहन घालून लोखंडी राॅडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. औरंगाबादेतील सिडको चौकात सोमवारी (दि. 1) मध्यरात्री ही घटना घडली.
ताईतवाले सध्या ते शिऊर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी एका हाॅटेलमध्ये गेले असता तिथे काही लोकांसोबत त्यांचा वाद झाला. यानंतर ते सिडको भागात गेले असता 6 हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून वाहन त्यांच्या अंगावर घातले. यात ते खाली पडले असता सहा जणांनी त्यांना लोखंडी राॅडने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुकुंदवाडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल यांनी ताईतवाले यांची रुग्णालयात जाऊन चौकशी केली. पोलिसांकडून सध्या आरोपींचा शोध सुरु असल्याचे जारवाल यांनी सांगितले.