ठाणे बहुजननामा : अदखलपात्र गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी ९ हजार रुपये घेतल्यानंतरही उरलेले १ हजार रुपये घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सहायक पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले. संदीप सुरेश बोराडे (वय ३४, रा़ कोलसेवाडी पोलीस ठाणे, रा़ भीमा सोसायटी, कल्याण पूर्व) असे अटक केलेल्यांचे नाव आहे.
याप्रकरणी एका ४७ वर्षाच्या तक्रारदाराने तक्रार दिली आहे. कोलसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रारदाराविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्याबाबत संदीप बोराडे यांनी या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी तसेच या पुढे सहकार्य करण्यासाठी त्यांच्याकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी ९ हजार रुपये तक्रारदाराने दिले होते.
त्यानंतर त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार गुरुवारी याची पडताळणी केली. त्यात बोराडे यांनी लाचेची मागणी केल्याचे आढळले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी ९ वाजता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून १ हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले.