बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रीय सुरक्षा गार्ड म्हणजेच एनएसजीची सुरक्षा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी नाकारली आहे. तर त्यांनी एनएसजीची सुरक्षा नाकारत केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा कायम ठेवली आहे. एनएसजीची सुरक्षा अमित शहा यांना केंद्रीय गृहमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर मिळणार होती. परंतु शाह यांनी हे सुरक्षा कवच नाकारत सीआरपीएफची सुरक्षा कायम ठेवली आहे. केंद्रीय गृहमंत्रालय समितीच्या रिपोर्टनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर अमित शाह यांना सर्वाधिक धोका आहे. अमित शाह यांच्याआधीचे गृहमंत्री राजनाथ सिंह, पी. चिदंबरम , सुशील कुमार शिंदे आणि शिवराज सिंह यांना देखील एनएसजीचे सुरक्षा कवच देण्यात आले होते.
परंतु एनएसजीची सुरक्षा नाकारत केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा कायम ठेवली आहे. यामध्ये निमलष्करी दलाचे १०० कमांडो शाह यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. जे कार्यालयापासून निवासस्थान तसेच प्रवासामध्ये शाह यांची सुरक्षा करत असतात. दिल्ली पोलिसांचे ५० जवान शाह यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेसाठी तैनात असतात.
एनएसजी म्हणजे काय
देशातील एलिट कमांडो फोर्स म्हणजेच एनएसजी. एनएसजीची स्थापना खास दहशदवाद्यांविरुद्ध ऑपरेशन्ससाठी करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित एनएसजी काम करते. एनएसजीची स्थापना १९८४ सालच्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर करण्यात आली. व्हीआयपी सुरक्षेचीही जबाबदारी ही एनएसजीकडे आहे. एनएसजीच्या युनिफॉर्ममुळे त्यांना मीडियामध्ये ब्लॅक कॅट कमांडो म्हणून ओळखले जाते.