नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या अटलँटामध्ये तीन मसाज पार्लरमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला आहे. या घटनेत आठ लोकांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये किमान चार मुळ आशियाई वंशाच्या महिलांचा समावेश आहे. अधिकार्यांनी ही माहिती दिली. अधिकार्यांनी मंगळवारी सांगितले की, या घटनेनंतर दक्षिण-पश्चिम जॉर्जियामध्ये 21 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. जॉर्जिया राज्यातील अटलँटा शहरात ज्या तीन मसाज पार्लरला निशाणा बनवण्यात आले आहे, त्यामध्ये दोन पार्लर एकमेकांच्या समोरासमोर आहेत.
अटलँटा पोलीस प्रमुख रोडनी ब्रायंट यांनी सांगितले की, उत्तरपूर्व अटलँटामध्ये एका स्पामध्ये तीन महिलांना ठार करण्यात आले तर एका अन्य स्पामध्ये आणखी एक महिला मारली गेली. त्यांनी सांगितले की, असे वाटते की, या चारही महिला आशियाई होत्या. अटलँटाच्या पोलीस अधिकार्यांना स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी एका स्पामध्ये गोळीबाराची माहिती मिळाली, जिथे तीन महिला मृतावस्थेत आढळल्या आणि त्यांच्या शरीरावर गोळ्या लागल्याच्या दिसत होते. अधिकारी घटनास्थळी असतानाच त्यांना आणखी एका स्पामध्ये गोळीबाराची माहिती मिळाली आणि तिथे एक महिला मृत आढळली.
जखमींचा झाला हॉस्पीटलमध्ये मृत्यू
यापूर्वी, सायंकाळी सुमारे पाच वाजता अटलँटापासून सुमारे 50 किलोमीटर उत्तरेला एकवर्थ शहरात ‘यंग्ज एशियन मसाज पार्लर’ मध्ये पाच लोकांना गोळी लागल्याची माहिती मिळाली. चेरोकी काऊंटी शेरिफ कार्यालयाचे प्रवक्ते कॅप्टन जे बेकर यांनी सांगितले की, दोन लोकांचा मृत्यू झाला आणि तीन जखमींना हॉस्पीटलमध्ये पाठवण्यात आले, जिथे त्यांच्यापैकी सुद्धा दोघांचा मृत्यू झाला. बेकर यांनी सांगितले की, अधिकार्यांनी अजून हे सांगितले नाही की, ‘यंग्ज एशियन मसाज पार्लर’मध्ये हल्ल्यात जखमी झालेले लोक महिला होते की पुरूष होते आणि कोणत्या वंशाचे होते.
एका व्यक्तीला घेतले ताब्यात
अधिकार्यांनी सांगितले की, गोळीबाराच्या काही मिनिटांपूर्वी सायंकाळी सुमारे साडेचार वाजता एकवर्थ गोळीबारातील एका संशयित सीसीटीव्ही देखरेखीत आढळून आला होता. बेकर यांनी सांगितले की, वुडस्टॉक येथे राहणार्या रॉबर्ट आरोन लाँग यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, लाँग अटलँटा गोळीबारात सुद्धा सहभागी आहे. गोळीबारानंतर आजूबाजूच्या परीसरातील लोकांना ट्रॅफिक जामला तोंड द्यावे लागले.