लखनऊ वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर चिखलफेक करण्याची एकही संधी सोडत नाही. बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी नरेंद्र मोदींवर टीका करण्यासोबत पंतप्रधानपदासाठी आपणच योग्य असल्याचा दावा आता करत आहेत.मोदी अनफिट असून मीच फिट आहे असा दावा मायावतींनी केला आहे.
मागच्या लोकसभेमध्ये मायावती एकही जागा न मिळवू शकणाऱ्या बसपा नेत्या मायावती मोदींवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त कागदावर प्रामाणिक आहे. प्रत्यक्षात मात्र ते प्रचंड भ्रष्टाचारी आहेत. माझ्याहून जास्त काळ मुख्यमंत्री राहिले असूनसु्द्धा मोदी यांची राजकीय कारकीर्द भाजपसाठी एक कलंक आहे. पंतप्रधानपदाचे काम सांभाळण्यात ते अयशस्वी झाले आहेत. देश चालवण्याासाठी मोदी पूर्णपणे अनफिट आहेत. मी मात्र देश चालवण्यासाठी योग्य उमेदवार आहे.’ असा विश्वास मायावती यांनी व्यक्त केला आहे.
येत्या २३रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. यावेळी भाजप प्रणीत NDA ला बहुमत मिळाले नाही तर तिसऱ्या आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे. या तिसऱ्या आघाडीत प्रादेशिक पक्षांचे आणि नेत्यांचे महत्त्व प्रचंड वाढणार आहे. त्यामुळेच मायावती यांच्या पंतप्रधानपदाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे .