सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – बार्शी तालुक्यातील वैराग येथेही एका व्यापार्याला कोरोनाची बाधा झाल्यामुळे संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्रात आले आहे. परंतु याच चिंताग्रस्त गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात अधिकारी व कर्मचारी चक्क दारूची पार्टी करताना आढळून आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वैराग येथे एका किराणा व भुसार मालाच्या ठोक व्यापार्याला कोरोनाची बाधा झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली आहे. त्यांचे अहवाल अजून प्रलंबित आहेत. तर संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्रात आणून कठोर उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. गाव भीतीच्या छायेखाली असताना संबंधित गावाचा कारभार जेथून चालतो, त्या ग्रामपंचायत कार्यालयात चक्क दारूची पार्टी होत असताना आढळून आले.
ग्रामविकास अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, पाणीपुरवठा अभियंता आणि मुख्य लिपीक असे चौघेही जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी दारूची पार्टी केली. दारू पार्टीचे चित्रीकरण करून समाज माध्यमातून प्रसारित करण्यात आले. त्यानंतर वैराग पोलीस ठाण्यात संबंधित अधिकारी व कर्मचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.