बहुजननामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षात अलीकडे भरतीचे वारे वाहताना दिसत आहे. विरोधी पक्षनेत्यांची रेलचेलही वाढत आहे. त्यात बॉलिवूडमधील अभिनेते, अभिनेत्रीनाही संधी मिळत आहे. भाजपमध्ये आता एका नव्या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. बॉलीवूडची मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकर येत्या विधानसभा निवडणूकीत भाजपचा प्रचार करणार आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, आताच तर राजकारणात उतरले आहे. मी आधी राजकारणाचा अभ्यास करणार असून राजकारण समजून घेणार आहे. त्यासाठी मी ग्राऊंड वर्क करणार आहे. त्यामुळे आतातरी मी निवडणूक लढविणार नाही. पण येत्या विधानसभा निवडणूकीत भाजपचा प्रचार करणार आहे.
ईशा कोप्पीकर गेल्या काही दिवसांत रुपेरी पडद्यावर झळकली नसली तरी ती सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते. ईशाने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत तिने भाजपचे ‘कमळ’ हातात घेतले. ईशाने आता राजकारणात पाऊल ठेवले आहे. सध्या ती ब्रॅंड एंडोर्समेंटशी संबंधित अनेक कार्यक्रमात उपस्थित असते. अलीकडेच ईशा सिन सिटीचा ‘क्लोदिंग ब्रॅंड’ लाँच करण्यासाठी पोहोचली होती. त्यावेळी दिलेल्या मुलाखतीत ईशाने राजकारण आणि फिल्मी करियरवर चर्चा केली. तिची मुलगी लहान असल्यामुळे सिनेमापासून दूर असुन ती लवकरच रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना दिसणार असल्याचे सांगितले. याशिवाय ती फॅमिलीसह बिझनेसही संभाळत आहे.
भाजपविषयी बोलताना ती म्हणाली, पहिले पाच वर्षे तुम्ही फक्त ट्रेलर पाहिले आता सिनेमा सुरू झाला आहे. भाजपचे काम उत्तम पद्धतीने सुरू आहे. काश्मीरमधील कलम 370 रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे नाव संपूर्ण जगात उज्ज्वल केले आहे. देशातील महिलांनी आणखी सक्षम व्हावे, अशी नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्याच्याच कार्यकाळात महिलांसाठी महत्वपुर्ण योजना आल्याचेही तिने यावेळी सांगितले.