पुणे : बहुजननामा ऑनलाईन – खून करून परिसरात वर्चस्व निर्माण करणाऱ्या कोंढवा येथील सराईत टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे ११ गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार या टोळीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
आकाश लाला म्हस्के (टोळीप्रमुख वय २४ ), ज्ञानेश्वर बालाजी लंगडे (वय १९), संकेत प्रकाश आल्हाट (वय २४), चंद्रभागा लाला म्हस्के (वय ४२), मंदा संजय जाधव (वय २८ सर्व रा. महंमदवाडी) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
कोंढवा परिसरात नागरिकांत दहशत निर्माण करणाऱ्या टोळीविरुद्ध मोकानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव कोंढवा पोलिसांनी सादर केला होता. त्यानुसार संबंधित पाच जणांच्या टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मोक्कानुसार ही तिसरी कारवाई
केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कंबर कसली आहे.