पुणे : बहुजननामा ऑनलाईन – लष्कर परिसरात फॅशन स्ट्रीटला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत ही आग विझल्यानंतरच घरी जात असताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. येरवडा परिसरात हा अपघात झाला असून, यामुळे अग्निशमन दल व कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
प्रकाश हासबे (वय 56) असे मृत्यू झालेल्या या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
प्रकाश हासबे हे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात्या अग्निशमन दलाचे प्रमुख होते. रात्री फॅशन स्ट्रीट मार्केटला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल व कॅन्टोमेंट फायर ब्रिगेड दाखल झाले. त्यानंतर आग विझवण्यासाठी जवान व अधिकारी यांनी शर्थीचे प्रयत्न करत ही आग दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग सव्वा एक वाजण्याच्या सुमारास विझली गेली. यानंतर कुलिंगचे काम बराच वेळ चालले. यानंतर प्रकाश हासबे यांनी सकाळी आगीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जाताना कर्मचाऱ्यांना दोन तासात पुन्हा कामावर परत येतो, असे सांगून ते कॅम्प येथून निघाले. येरवडा मार्गे ते विमानतळ रोडने घरी जात होते. यावेळी त्यांना भरधाव पीमएमपीने जोरात धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माहिती मिळताच घटनास्थळी येरवडा पोलिसांनी धाव घेतली. दरम्यान प्रकाश यांच्या अपघाती निधनाने अग्निशमन दल व त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.