अहमदनगर/ श्रीगोंदा : बहुजननामा ऑनलाइन – नगर-दौंड महामार्गावर लोणी व्यंकनाथ शिवारातील पवारवस्ती फाटा येथे आज (बुधवार) झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. हा अपघात सकाळी अकराच्या सुमारास झाला असून, अपघातात मृत्यू झालेले चौघे जण वर्गमित्र होते. मालट्रकच्या धडकेत हा अपघात झाला.
घटनास्थळावरील व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, नगरच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या मालट्रकने या चौघांना उडविले. त्यात राजकुमार पवार (वय 18), विशाल सोनवणे, संजय बरकडे हे तिघे जागीच ठार झाले, तर प्रतीक नरसिंग शिंदे याला गंभीर जखमी अवस्थेत दौंडला रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, हे चौघे वर्गमित्र असून, ते 18 वर्षे वयोगटातील होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.