मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून वाद सुरूच असून त्यात राजकारण्यांचे आरोप-प्रत्यारोप करणेही चालू आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधत शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा दाखवा, असे आव्हान केले होते. पण आता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी संजय राऊत यांना उत्तर दिले आहे. आम्ही राजघराण्यात जन्मलो याचे नेमके काय पुरावे द्यायचे? असा प्रश्नच त्यांनी केला आहे. तसेच आम्ही राजघराण्यात जन्माला आलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. हा वाद त्यांनी सुरु केला आहे, आता तो संपवायचा कसा हे त्यांनीच बघावं, असे शिवेंद्रराजे म्हटले आहेत. इतकेच नाही तर संजय राऊत हिंदू आहेत की मुघलांची औलाद? असा प्रश्न भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.
सत्तेसाठी इतकी लाचारी पत्करली की जनता यांच्यावर आता थुंकेल. यांच्या रक्तातच गद्दारी आहे. म्हणून लोकसभेच्या निकालानंतरच सत्तास्थापनेच्या चर्चा सुरु केल्याचे त्यांनी कबूल केलं आहे. शिवसेना एकटी लढली नसती तर २५ जागा पण निवडून आल्या नसत्या यांची जाणीव त्यांना होती, म्हणून भाजपसोबत युतीत लढले. म्हणूनच ५५ जागांची मजल मारू शकले, असे प्रसाद लाड म्हणाले.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यावर बोलताना जाणता राजाची बिरुदावली छत्रपतींनाच दिली जाते. दुसऱ्यांवर आक्षेप घेताना इतरांचे आक्षेपही कबूल केले पाहिजेत. ही दुटप्पी भूमिका आहे. इतर नेत्यांना महाराजांची उपाधी दिली तर त्याचीही चर्चा होणारच. शिव म्हणजे महाराजांशी संबंधित असल्यामुळे शिवसेनेच्या नावाबाबत उदयनराजेंनी भूमिका अगदी योग्य असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.
सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे भोसले, श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे या सर्वांचा आदर असून त्या गाद्यांचा आम्ही सन्मान करतो. त्यांना आम्ही जर यावर भूमिका घ्या असं बोललो तर त्यात चुकीचं काय? असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला.