नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व दिल्लीत 2013 मध्ये पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्या दोन दोषींना दिल्लीच्या न्यायालयाने गुरूवारी 20 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश नरेश कुमार मल्होत्रा यांनी पीडितेला 11 लाख रुपये भरपाई देण्याचा आदेशही दिला. पीडितेचे अधिवक्ता एच. एस. फूलका यांनी म्हटले की, ते या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करणार आहेत आणि दोन्ही दोषींना जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी करणार आहेत.
गांधीनगरमध्ये 15 एप्रिल 2013 मध्ये घडलेल्या या घटनेतील दोषींनी मुलीच्या शरीरात एक वस्तु घुसवली होती आणि ती मृत झाल्याचे समजून तिला एका खोलीत टाकून दिले होते. मुलीला 40 तासानंतर 17 एप्रिलला या खोलीतून बाहेर काढण्यात आले होते.
या सामूहिक बलात्कार प्रकरणात दिल्लीच्या न्यायालयाने मनोज शाह, प्रदीप कुमारला दोषी ठरवले होते. न्यायालयाने म्हटले, या घटनेमुळे समाजाच्या भावना बधीर झाल्या होत्या. तर कोर्टातून बाहेर पडताना एका आरोपीने पत्रकारांवर हल्ला केला. तसेच फोन सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न केला.
प्रकरणातील दोन आरोपी प्रदीप आणि मनोजविरूद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, सामुहिक बलात्कार, अपहरचा गुन्हा दाखल आहे. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली तेव्हा गुडीया अवघी पाच वर्षांची होती. घटना 15 एप्रिल 2013 ची आहे. याच दिवशी संध्याकाळी गुडीया गांधी नगरमधील आपल्या घरातून बेपत्ता झाली होती. आणि 17 एप्रिलला सकाळी घराच्या जवळ सापडली होती. ज्यानंतर वैद्यकीय तपासणीत सर्व गोष्टींचा खुलासा झाला होता.