बहुजननामा ऑनलाईन टीम
अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक आरोपी दीपेश सावंत याने दिल्याचे अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) न्यायालयाला सांगितले. त्याच्या माहितीच्या आधारे रविवारी एनसीबीने रियाकडे चौकशी सुरू केली.
दीपेश सुशांतचा नोकर होता. 14 जूनला सुशांत वांद्रे येथील निवासस्थानी मृतावस्थेत आढळला. तेव्हा मित्र सिद्धार्थ पिठानी, आचारी नीरज सिंह, केशव बचनेर यांच्यासह दीपेशही तेथे उपस्थित होता. अमली पदार्थाच्या खरेदी-विक्री प्रकरणात नाव पुढे आल्यानंतर एनसीबीने दीपेशकडे चौकशी सुरू केली. सुशांतच्या मृत्यूपूर्वी, जून महिन्याच्या पहिल्या आठवडयात शोविकच्या सांगण्यावरून दीपेशने ‘मॉन्ट ब्लॅक’ इमारतीखालीच ऋषीकेश पवार या तरुणाकडून 100 ग्रॅम गांजा मिळवला होता. त्याआधी 1 आणि 2 मेला शोविकने त्याला इमारतीखाली आलेल्या व्यक्तीकडून गांजा आणि 50 ग्रॅम चरस आणण्यासाठी पाठवले होते. दोन्ही वेळेसा ड्वेन नावाच्या तरुणाने अमली पदार्थ आणले होते. त्यानंतर शोविकने दीपेशकडून संबंधिताचा मोबाईल घेतला. 17 एप्रिलला रिया आणि शोविकच्या सूचनेवरून इमारतीखाली आलेल्या कैझान इब्राहिम तरुणाकडून दीपेशने 10 ग्रॅम चरस आणले, तर सॅम्युअल मिरांडासोबत (सुशांतचा व्यवस्थापक) वांद्रे परिसरात जाऊन झैद विलात्राकडून गांजा आणला, अशी माहिती दीपेशच्या चौकशीतून पुढे आली.