मल्लपुर : बहुजननामा ऑनलाइन – केरळमधील मल्लपुरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १२ वर्षीय शाळकरी मुलीवर गेल्या २ वर्षांमध्ये ३० हून अधिक वेळा बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे आणि संतापजनक बाब म्हणजे या कृत्यात तिच्या जन्मदात्या पित्याचादेखील हात होता.
आपल्या भाड्याच्या दोन खोल्यांच्या घराच्या दरवाजावर चिमुकलीने ‘सॉरी अम्मा’ असे खडूने लिहून आपल्या आईच्या नावे या चिमुकलीने संदेश लिहिला. तिच्यावर गेल्या २ वर्षांमध्ये ३० हून अधिक वेळा बलात्कार करण्यात आला. परंतु या कृत्यात आपले वडीलही सहभागी आहेत, त्यांना अटक झाली तर आपले गरीब कुटुंब रस्त्यावर येईल, आपल्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळेल, ही समज त्या चिमुरडीला होती. त्यामुळे आपल्या वडिलांना शिक्षा मिळावी असे या चिमुकलीला वाटत नव्हते. म्हणून अशा प्रकारे तिने आपल्या आईची माफी मागितली.
आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार होत आहेत, याची पूर्ण कल्पना तिच्या आई-वडिलांना होती. १० वर्षांची असतानाच चिमुकलीवर लैंगिक अत्याचार सुरू झाले. या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलीने जेव्हा समुपदेशन सत्रात आपले भीतीदायक अनुभव ऐकवले तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीसोबत घडलेला हा प्रकार ऐकून काउंसिलरनाही धक्का बसला. समुपदेशकांनी सांगितले कि, तिला तुझ्या घरात कसं काय सुरू आहे, असा प्रश्न विचारल्यानंतर तिला रडू कोसळले. घरात आजारी आजी आहे. घरची आर्थिक परिस्थिती इतकी बेताची आहे कि घराचे भाडे देखील देणे कठीण आहे,आपले लैंगिक शोषण होत आहे, याची या मुलीला कल्पनाच नव्हती असे समुपदेशक सांगतात.
वडिलांच्या मित्रानेच आपल्यावर सर्वात पहिल्यांदा आपल्या बलात्कार केल्याचे मुलीने सांगितले. तो तिच्या कुटुंबाला पैसे पुरवत होता. नंतर हा प्रकार वाढत गेला आणि पुढे इतर लोकांकडूनही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणात आणखी एक तिसरी व्यक्ती होती, जी पैसे वसूल करण्याचे काम करत होती. या व्यक्तीला मात्र पीडित मुलगी कधीही भेटली नसल्याचे ती सांगते. मुलीचे वडील बेरोजगार असून त्याने तिच्या आईलादेखील देहविक्री करण्यास भाग पडले होते.
तिरुरंगदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक नौशाद इब्राहिम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका दंडाधिकाऱ्यासमोरच या मुलीचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तिच्यावर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय अहवालात सिद्ध झाले आहे. या प्रकरणी रविवारी रात्री पीडित मुलीच्या वडलांसह तीन लोकांना अटक करण्यात आली असून इतर लोकांचा शोध सुरू आहे. या आरोपींविरुद्ध पॉक्सो कायदा, भारतीय दंड विधान कलम २५४ आणि ३७६, तसेच बाल न्याय आणि संरक्षण अधिनियमांअतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
Visit : bahujannama.com