जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – महानगरपालिकेच्या स्थायी सभापती यांच्या दालनात असलेली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची एकत्रित मोठी प्रतिमा काढण्यात आली; तसेच या जागी लहान आकारातील वेगवेगळ्या चार प्रतिमा लावल्याने आंबेडकर नगरातील रहिवाश्यांनी संताप व्यक्त केला. तसेच महापालिकेत येवून पुन्हा पूर्वीची मोठी प्रतिमा दालनात लावण्याचा आग्रह धरला. अखेर उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्याहस्ते पुन्हा जुनीच प्रतिमा लावण्यात आली.
जळगाव महापालिकेत २०१५ मध्ये महिला बालकल्याण समितीच्या सभापती खुशबु कमलाकर बनसोडे या असतांना त्यांनी प्रशासनाची परवानगी घेऊन त्यांच्या दालनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची एकत्रित मोठी प्रतिमा लावली होती. तेव्हापासून या दालनात ही प्रतिमा कायम होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाची सत्ता महापालिकेत आली. त्यानतंर त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेत बदल केलेत. महिला बालकल्याण समितीचे दालन स्थायी सभापती जितेंद्र मराठे यांना देण्यात आले..