मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी दर वर्षी ६ डिसेंबर रोजी देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांचे अनुयायी चैत्यभूमी, दादर येथे येतात. लाखोंच्या संख्येने लोक या ठिकाणी पोहोचतात मात्र, अनेकदा अनुयायांची राहण्याची, जेवणाची व गाड्यांची कमतरतेने गैरसोय होते. चैत्यभूमीवर दाखल होणाऱ्यांमध्ये महिला व लहान मुलांची संख्या देखील मोठी असते. प्रत्येक वर्षी राज्यभरातून मुंबईला पोहचण्यासाठी अतिरिक्त रेल्वेच्या गाड्यांचे नियोजन करण्यात येते. यावर्षी अनुयायांना प्रवासासोबत राहण्याची, जेवणाची, स्थानिक वाहतूक, मोबाईल रिचार्जची अशा अनेक सुविधा पुरवण्यासाठी शासन सज्ज झाले आहे. यावर्षी प्रशासनाने लोकांची गैरसोय टाळण्यासाठी तयारी केलेली आहे.
शिवाजी पार्क मैदानावर लोकांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. यासोबत महापालिकेच्या सहा शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
शिवाजी पार्क आणि मैदान परिसरात 18 फिरती शौचालयं, रांगेत उभे असणाऱ्यांसाठी चार फिरती शौचालयांची सुविधा देण्यात आली आहेत. तसंच पिण्याच्या पाण्याचे 16 टँकर्स उभे करण्यात आले आहेत.बेस्टतर्फे चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर चौपाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘राजगृह’ हे निवासस्थान, आंबेडकर महाविद्यालय येथे 301 अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे बसविण्यात आले आहेत.
अनुयायांना मोबाइल फोन रिचार्ज करण्याची समस्या भेडसावत असते. त्यांच्यासाठी 300 पॉईंटची व्यवस्था करण्यात आली आहे.
अनुयायींना दादरला पोहोचता यावं यासाठी मध्य रेल्वेकडू रात्रीच्या वेळी विशेष लोकलची सुविधा देण्यात आली.
गाड्यांचं वेळापत्रक
– दादर-ठाणे विशेष लोकल मध्यरात्री १.१५ वा.
– दादर-कल्याण विशेष लोकल मध्यरात्री २.२५ वा.
– दादर-कुर्ला विशेष लोकल पहाटे ३ वा.
– कुर्ला-दादर विशेष लोकल रात्री १२.४५ वा.
– कल्याण-दादर विशेष लोकल रात्री १ वा.
– ठाणे-दादर विशेष लोकल रात्री २.१० वा.
– हार्बरवर कुर्ला-मानखुर्द विशेष लोकल रात्री २.३० वा.
– कुर्ला-पनवेल विशेष लोकल रात्री ३ वा.
– कुर्ला-वाशी विशेष लोकल पहाटे ४ वा.
– वाशी-कुर्ला विशेष लोकल रात्री १.३० वा.
– पनवेल-कुर्ला विशेष लोकल रात्री १.४० वा.
– मानखुर्द-कुर्ला विशेष लोकल पहाटे ३.१० वा.
याशिवाय अनुयायांसाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. तसंच बसच्या पासची सोयदेखील उपलब्ध करण्यात आली आहे. शहरी प्रवासासाठी ५० रु., उपनगरीय प्रवासासाठी ६० रु., संपूर्ण प्रवासासाठी ९० रुपयांचा मॅजिक पास आहे. हे विशेष तिकीट असल्याने त्यासाठी ओळखपपत्राची आवश्यकता लागणार नाही.यामुळे अनेक अनुयायांचा यावर्षीचा महापरिनिर्वाण दिनाचा प्रवास सोयीचा असणार आहे.